नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे आम आदमी पार्टी भाजपवर सातत्याने टीका करत आहे. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजप दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी केली आहे.
'या नेत्यांना अटक होणार...'
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अरविंद केजरीवालांना समन्स आले, आता पुढची बारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची असेल. हेमंत सोरेन यांच्यानंतर राजदचे तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये अटक केली जाईल. हे इथेच थांबणार नाही, यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनाही अटक होईल. त्यानंतर सीएम पिनराई विजयन, तामिळनाडूमध्ये सीएम स्टॅलिन, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनाही अटक केली जाईल.
प्रत्येक राज्यांतील प्रमुख नेत्यांना अटक करून भाजपला लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक केल्यास लोकशाहीचा पायाच डळमळीत होईल. भाजपला पराभवाची भीती आहे, त्यामुळे त्यांना एकट्यानेच शर्यतीत उतरायचे आहे. विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकून भाजपला जागा जिंकायच्या आहेत, अशी टीकाही चड्ढा यांनी यावेळी केली.
'भाजपला पराभवाची भीती'
राघव चढ्ढा पुढे म्हणतात, इंडिया आघाडीचा उमेदवार निवडणूक लढला तर भाजपच्या जागा कमी होतील. यामुळे भाजपला पराभवाची भीती वाटू लागली आहे. एखादा नेता तुरुंगात असेल तर तो निवडणूक लढवू शकणार नाही, त्यामुळे भाजप विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न करत आहे. या योजनेअंतर्गत भाजप केजरीवाल यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे पुढील लक्ष 14 लोकसभा जागा असलेल्या झारखंडवर आहे. या सर्व जागांवर भाजपची अवस्था वाईट आहे, त्यामुळेच ते हेमंत सोरेन यांना अटक करू शकतात.
95% विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल2014 पासून केंद्रीय एजन्सींनी नोंदवलेल्या 95% केसेस विरोधी नेत्यांच्या विरोधात आहेत. गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी भाजप त्यांची पिळवणूक करते. या नेत्यांनी शरणागती पत्करली नाही तर निवडणुकीच्या आसपास त्यांना अटक केली जाते. या देशात एक पक्ष आणि एकच नेता ठेवणे, हेच भाजपचे उद्दिष्ट आहे. अशाने देशाची लोकशाही धोक्यात येईल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.