नवी दिल्ली - केंद्रात सत्तेवर आल्यास वादग्रस्त अफस्पा कायद्यात सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून दिले आहे. मात्र काँग्रेसने दिलेल्या या आश्वासनावरून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सीमेवर लढणाऱ्या जवानांची शक्ती वाढवू इच्छितात की, त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा सवाल अमित शहा यांनी विचारला आहे. 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा आज प्रकाशित केला. या जाहीरनाम्यातून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रांसाठी भरघोस आश्वासने देण्यात आली असून, सत्तेत आल्यास काही संवेदनशील कायद्यांमध्येही सुधारणा करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. पूर्वोत्तर राज्यांत आणि जम्मू काश्मीरमध्ये तैनात लष्कराला विशेषाधिकार देणाऱ्या अफस्पा या कायद्यात संशोधन करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. मात्र काँग्रेसने जाहीरनाम्यामधून दिलेल्या या आश्वासनावरून वादाला तोंड फुटले आहे. ''जे जवान सीमेवर लढत आहेत त्यांचे बळ वाढवायचे आहे की त्यांचे मनोबल खच्ची करायचे आहे, हे मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारू इच्छितो.'' असा सवाल अमित शहा यांनी केला आहे.
जवानांचे मनोबल खच्ची करायचे आहे का? अफस्पावरून अमित शहांचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 4:25 PM