नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यानं 16 जानेवारीला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. भाजपाचे नेते अनिल बलुनी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. बलुनी यांनी ट्विट केले आहे की, 'आपणा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती पूर्णतः सुधारली आहे. AIIMSमधून डिस्चार्ज घेऊन ते आपल्या निवासस्थानी परतले आहेत. बलुनी यांनी पार्टीचे कार्यकर्ते आणि शहा यांच्या शुभचिंतकांचे आभारदेखील व्यक्त केले आहेत.
दरम्यान, अमित शहांना झालेल्या आजारावर टीका करताना काँग्रेसचे खासदार बी. के हरिप्रसाद यांनी वादग्रस्त विधान केले. बी. के हरिप्रसाद यांनी अमित शहांच्या आजारपणाची खिल्ली उडवत म्हटले होते की, ‘अमित शाह को सुअर जुकाम हो गया’. शिवाय, शहा यांना कर्नाटकच्या जनतेचा शाप लागला आहे, जर कर्नाटकच्या सत्तेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर अमित शहा यांना गंभीर आजार होईल'', असेही हरिप्रसाद यांनी म्हटले होते.
बी.के.हरिप्रसाद यांच्या वादग्रस्त विधानाचा भाजपा नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी हरिप्रसाद यांचे विधान अतिशय असंवेदनशील आणि असभ्य असल्याचे म्हटले. विजयवर्गीय म्हणाले की,''काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी कोणत्या कारणांमुळे आजारी आहेत आणि आजारपणाचे कारण आम्हाला का सांगत नाहीत?, मी अशी विचारणा केल्यास, ते अयोग्य ठरेल. एखादा व्यक्ती कोणत्याही विचारधारेचा असो, त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास आपण केवळ आरोग्यासाठी प्रार्थना केली पाहिजे''.
''काँग्रेसने अमित शहा यांच्या आजाराबाबत ज्या प्रकारे वक्तव्य केलं आहे, ते निषेधार्ह आहे. काँग्रेस किती खालच्या पातळीला जाऊन टीका करू शकते, याचे हे उदाहरण आहे. स्वाइन फ्लू या आजारावर उपचार होऊ शकतात. मात्र काँग्रेस नेते मनोरुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार होणे कठीण आहे'', असे ट्विट करत पियुष गोयल यांनी शाब्दिक हल्ला केला आहे.