नवी दिल्ली: देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपा यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. दिल्लीत 'फिर एक बार मोदी सरकार' आणण्यासाठी भाजपाचं नेतृत्त्व कामाला लागलं आहे. पुन्हा एकदा दिल्ली जिंकण्यासाठी भाजपानं देशातील सर्वच्या सर्व म्हणजेच 543 जागांसाठी मेगा प्लान तयार केला आहे.देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. या प्रत्येक जागेसाठी भाजपा एक प्रभारी नियुक्त करणार आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघासाठी प्रभारींची नियुक्ती होईल, ते प्रभारी त्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे असतील. याशिवाय प्रत्येक राज्यात 11 सदस्यांची एक 'इलेक्शन टीम' असेल. ही टीम 13 विशिष्ट मुद्यांवर लक्ष देईल. 'हिंदुस्तान टाईम्स'नं भाजपाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याबद्दलचं वृत्त दिलं आहे. भाजपा अशाप्रकारे पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघामागे एका प्रभारी नेमणार आहे. बहुजन समाज पक्ष कित्येक वर्षांपासून या पद्धतीनं निवडणुकीची योजना आखतो आहे. मोदी-शहा जोडगोळीला 2019 ची लोकसभा निवडणूक 2014 पेक्षा मोठ्या फरकानं जिंकायची असल्याचं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं. 'मोदी-शहा संघटनेवर जास्त भर देत आहेत. 2019 च्या पार्श्वभूमीवर मोदी-शहांनी ही सर्व तयारी सुरू केली आहे,' अशी माहिती या नेत्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेतृत्त्वानं प्रत्येक राज्यातील भाजपा संघटनेला विविध सामाजिक मुद्यांवर आधारित अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. याशिवाय सध्याची राजकीय परिस्थिती, विरोधकांची रणनिती, आघाडीच्या शक्यता, सरकारी योजनांच्या लाभार्थींची यादी अशा विविध मुद्यांची माहितीदेखील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं मागवली आहे.
मिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 5:23 PM