नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जिवाला धोका असल्यानं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमित शहा यांना एएसएलची अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत वावरणारे अमित शहा यांना आता संपूर्ण देशभरात फिरण्यासाठी एएसएलचं कवच प्राप्त झालं आहे. गुप्तचर विभागानं केलेल्या आढाव्यानंतर गृहमंत्रालयानं अमित शहा यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमित शहा यांना पुरवण्यात आलेल्या नवीन सुविधेनुसार, ज्या ठिकाणचा अमित शहा यांना दौरा करायचा आहे, आधी एएसएलची टीम त्या ठिकाणाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेईल. यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला सुरक्षा संबंधित सूचनांचे पालन करण्यास सांगितले जाईल. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना अमित शहा यांच्या नवीन सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील संपूर्ण प्रक्रियांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमित शहा यांच्या दौऱ्याच्या दोन आठवड्यांपूर्वी एएसएल (ASL) टीम कार्यक्रम ठिकाणाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेईल.
अमित शहा यांच्या सुरक्षेसंदर्भात एका आढावा बैठक घेण्यात आली होती. ज्यामध्ये आयबीनं त्यांच्या जिवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षेत वाढ करण्याची शिफारस गृहमंत्रालयाकडे केली होती. अमित शहा यांना राऊंड क्लॉक सीआरपीएफचे सुरक्षा कवच मिळतं. याशिवाय, 30 कमांडो प्रत्येक वेळेस त्यांच्या अवतीभोवती असतात. या व्यतिरिक्त त्यांच्या सुरक्षेसाठी राज्यांतील स्थानिक पोलीसदेखील तैनात असतात.