J P Nadda ( Marathi News ) : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या जागेवरून आपला राजीनामा दिला आहे. नड्डा यांची मागील महिन्यात गुजरातमधून राज्यसभेवर वर्णी लागली असल्याने त्यांनी आता हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या जागेवरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसभा निवडणुकीत देशभरातून ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये गुजरातमधून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचाही समावेश होता. जे. पी. नड्डा हे दोन ठिकाणांहून राज्यसभा सदस्य असल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी एका जागेवरून आपला राजीनामा दिला असून राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
अध्यक्षपदीही मिळाली आहे मुदतवाढ
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. आता जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप लोकसभेची निवडणूक आता जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालीच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवले होते. त्यानंतर जे. पी. नड्डा यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.