नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायदा अर्थात CAA वरून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिमला येथे आय़ोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग जे करू शकले नाही, ते मोदींनी करून दाखवल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.
येथील कार्यक्रमात नड्डा म्हणाले की, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग या सर्वांनी म्हटले होते, आम्ही पाकिस्तानातील पीडित अल्पसंख्यांक नागरिकांना भारतात परत आणू, मात्र ते करण्यात त्यांना अपयश आले. याउलट पंतप्रधान मोदींनी ते करून दाखवलं आहे.
नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिहारमधील 11 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा आणि लोकांना हे तंत्रज्ञान समजावून सांगण्याच्या सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिहारवर आशीर्वाद आहे. त्यांनी येथे कोट्यवधीचा निधी दिला आहे. हा निधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्याचे नड्डा म्हणाले.दरम्यान कलम 370 आणि तीन तलाक यावरून समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचे आदेश नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.