नवी दिल्लीभारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द नड्डा यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.
"कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'होम आयसोलेशन'मध्ये आहे", अशी माहिती जे.पी.नड्डा यांनी दिली आहे. "कोरोनाची लक्षणं जाणवत असल्यानं चाचणी केली होती आणि अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनच्या सर्व नियमांचं पालन करुन योग्य ते उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्याशी संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन तात्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यावी", असंही नड्डा यांनी म्हटलं आहे.
जे.पी.नड्डा नुकतेच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील झाली होती. यात सुदैवाने नड्डा यांनी कोणतीही दुखापत झाली नव्हती. पण भाजपचे सचिव कैलाश विजयवर्गीय यांना दुखापत झाली होती.
तीन दिवसांनी महाराष्ट्राचा दौरा करणार होते नड्डाजे.पी.नड्डा येत्या १८ डिसेंबर रोजी तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. पण आता कोरोनाचं निदान झाल्यामुळे नड्डा यांचा दौरा जवळपास रद्द झाला आहे.