BJP Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने निर्धारित केले आहे. यातच आता नवीन रणनीतिवर भाजपा काम करताना दिसत आहे. राज्यसभेतील वरिष्ठांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, असा कयास बांधला जात आहे.
भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह राज्यसभेतील बडे दिग्गज लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात. पक्षाने अशा अनेक दिग्गजांना त्यांच्या राज्यातून उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला आहे. जेपी नड्डा हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तीन वेळा आमदार राहिलेल्या जेपी नड्डा यांच्यासाठी ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल, असे सांगितले जात आहे.
दोनपेक्षा जास्तवेळा कार्यकाळ न देण्याचे पक्षाचे धोरण
पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना दोनपेक्षा जास्त कार्यकाळ न देण्याचे धोरण भाजपाचे आहे. या धोरणांतर्गत मुख्तार अब्बास नक्वी यांना केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना राज्यसभेचे तिकीट देण्यात आले नव्हते. जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यास या धोरणाबाबत सकारात्मक संदेश जाईल, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. जेपी नड्डा यांची राज्यसभेतील ही दुसरी टर्म आहे. त्यांचा कार्यकाळ यावर्षी संपत आहे.
दरम्यान, भाजपा सध्या पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येतील राममंदिर आणि लोकसभा निवडणुका या दोन्हींची तयारी पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हरलेल्या १६० जागांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.