नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका कार्यक्रमात बोलताना तमिळनाडूतील मदुरै येथे एम्सचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच येथील रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, भाजप अध्यक्षांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे काँग्रेस खासदाराने म्हटल. विशेष म्हणजे खासदार बी. मानिकम टैगोर यांनी घटनास्थळी जाऊन हा दावा खोटा ठरवला आहे. त्यांच्यासमवेत मदुरैचे खासदार सु. वेंकटेशन हेही यावेळी हजर होते.
भाजपाध्यक्षांच्या विधानानंतर या दोन्ही खासदारांनी थोप्पूर येथे उभारण्यात येणाऱ्या एम्सच्या साईटला भेट दिली. त्यावेळी, हातात फ्लेक्स घेऊन मदुरै एम्स रुग्णालयाची इमारत कोठे आहे? असा सवालही उपस्थित केला. जेपी नड्डांनी 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मग, ती 95 टक्के काम पूर्ण झालेली एम्सची इमारत कोठे केली? असा प्रश्न विचारत दोन्ही खासदारांनी भाजपाध्यक्षांचं विधान धादांत खोटं असल्याचं दाखवून दिलं. आम्ही जागेवर जाऊन तब्बल १ तास पाहणी केली. पण, आम्हाला तेथे काहीही सापडलं नाही, असे म्हणत खासदार मनिकम टॅगौर यांनी फोटोही ट्विट केले आहेत.