हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ यावर्षी एप्रिलमध्ये संपत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी अनेकांना उमेदवारी देण्याचा विचार पक्षनेतृत्व करत आहे.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबाबतीत महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये समाप्त होणार आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेस सत्तेत असल्याने ते या राज्यातून निवडून येऊ शकत नाहीत. पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांनी स्वत: लढण्याऐवजी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर देखरेख करणे अपेक्षित आहे.
दुसरे म्हणजे त्यांना इतर कोणत्याही राज्यातून राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्यास ते राजकीयदृष्ट्या चुकीचे ठरेल. अमित शाह यांनीही २०१४ ची निवडणूक लढविली नाही आणि उत्तर प्रदेश या महत्वाच्या राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून काम केले. या राज्यात भाजपने ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या.