यूपीत हिंसक आंदोलन घडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून होतेय आर्थिक मदत; भाजपाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 07:09 PM2020-01-07T19:09:07+5:302020-01-07T19:11:55+5:30
त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं.
बरेली - उत्तर प्रदेशात सुरु असणाऱ्या हिंसक कृत्यासाठी भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना जबाबदार धरलं आहे. दुसऱ्या राज्यातील गुंड आणून युपीमध्ये दंगल घडविण्याचा आरोप भाजपानेकाँग्रेसवर केला आहे. त्याचसोबत युपीत कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रियंका गांधींकडून आर्थिक मदतही पुरवली जातेय असंही त्यांनी सांगितले.
बरेलीमधील एका सभेत बोलताना भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशात मागील तीन वर्ष शांतता होती मग आता हिंसा का घडवताय? असा सवाल त्यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे. त्या राजस्थान, मध्यप्रदेश याठिकाणी हिंसा का नाही करत? हिंसक कृत्यासाठी आर्थिक मदतही केली जाते. दुसऱ्या राज्यातून समाज कंटकांना आणलं जात आहे. शांतता भंग करण्यासाठी दगडफेकीचे प्रकार सुरु आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना नेहरुंनी काय केलं न मनमोहन सिंग काय करु शकले असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्याकांचं जगणं कठीण झालं होतं. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याने ऐतिहासिक असा निर्णय घेऊन सीएए कायदा आणला. नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारताबाहेरील अल्पसंख्याक समुदायातीय शरणार्थींना भारताचं नागरिकत्व देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारं आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजना आणि अन्य सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आहे असं भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षाकडून सीएए कायद्याबाबत चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भारतीय मुस्लिमांची नागरिकता जाणार ही अफवा आहे. समाजवादी पक्षाचे राम मनोहर लोहिया यांनीही सांगितले होते पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून त्यांना भारताची नागरिकत्व द्यायला हवं असं सांगितले. पण समाजवादी पक्षाला संस्थापकांचे शब्द आठवत नाहीत. त्यांच्या नेत्यांना फक्त घराणेशाहीचं राजकारण करायचा आहे असा आरोप भाजपा नेते स्वतंत्रदेव सिंह यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर केला.