मुंबई : लोकसभेची निवडणूकभाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. 'फिर एक बार, मोदी सरकार'साठी त्यांनी जय्यत तयारी केलीय. कार्यकर्त्यांची फळी, स्टार प्रचारकांची फौज, रणनीती, सोशल मीडिया सेल सगळं सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर त्यांच्यासाठी ब्रह्मास्त्रासारखेच आहेत. परंतु, कानपूर भाजपाकडे अशी एक खुर्ची आहे, जी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसवू शकते, असा त्यांना ठाम विश्वास वाटतोय. म्हणूनच, अडीच-तीन वर्षं काचेच्या पेटीमध्ये जपून ठेवलेली ही लाकडी खुर्ची त्यांनी मोदींच्या सभेसाठी बाहेर काढली आहे. ही खुर्ची भाजपासाठी शुभ आहे, नरेंद्र मोदी जेव्हा-जेव्हा या खुर्चीवर बसलेत, तेव्हा कानपूर आणि आसपासच्या परिसरातील जागांवर कमळ फुललंय, तसंच राज्यातही भाजपाला लक्षणीय यश मिळालंय, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशात १९ ऑक्टोबर २०१३ला प्रचाराचा शंख फुंकला होता. या सभेवेळी ते ज्या खुर्चीवर बसले होते, ती खुर्ची आज 'लकी खुर्ची' मानली जाते. एप्रिल २०१४ मध्ये कानपूरच्या कोयला नगर मैदानावर झालेल्या सभेतही मोदी याच खुर्चीवर बसले होते आणि पुढच्याच महिन्यात देशाचे पंतप्रधान झाले होते, अशी माहिती भाजपाचे कानपूर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र मैथानी यांनी दिली.
त्यानंतर, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मोदी कानपूरला गेले, तेव्हा त्यांच्या सभेसाठी हीच खुर्ची स्टेजवर ठेवण्यात आली होती. त्यानंतर, भाजपाने यूपीत मुसंडी मारली, ती सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे उद्या, ८ मार्चला होणाऱ्या सभेसाठीही कानपूर भाजपाने ही खुर्ची तयार ठेवलीय. ती मोदींसाठी - भाजपासाठी पुन्हा लकी ठरते का, त्यांची स्वप्नपूर्ती करते का, हे पाहणं नक्कीच रंजक असेल.