'राहुल गांधी कुठं जातात?', गोपनीय विदेश दौऱ्यांचा तपशील द्यावा, भाजपाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 08:48 PM2019-10-31T20:48:37+5:302019-10-31T20:52:40+5:30
'राहुल गांधी 2014 पासून 16 वेळा विदेशात गेले.'
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यावरून भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार व प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी भाजपा मुख्यालयात पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी जगातील लोक मेडिटेशन (ध्यानधारणा) करण्यासाठी भारतात येतात. मात्र, यासाठी राहुल गांधी विदेशात जात आहेत. भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी गोपनीय दौरे करत आहेत, असे म्हणत जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
जीव्हीएल नरसिम्हा राव म्हणाले, "राहुल गांधी 2014 पासून 16 वेळा विदेशात गेले. त्यापैकी नऊ विदेशी दौऱ्यांबाबत काहीच माहिती नाही. राहुल गांधी जितक्या वेळा आपला मतदारसंघात गेले नाही. त्यापेक्षा जास्त वेळा विदेश दौरे केले. त्यामुळे त्यांना अमेठीतील जनतेने नाकारले." याचबरोबर, राहुल गांधी आपले विदेशी दौरे गोपनीय का ठेवतात? हे विदेशी दौरे गोपनीय ठेवण्यामागील हेतू कोणता, असे सवाल करत जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी यासंदर्भात भाजपा उत्तर मागणार असल्याचे सांगितले.
तसेच, राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांचा खर्च कोण करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी सार्वजनिक केली पाहिजे. नियमानुसार, प्रत्येक खासदाराला आपल्या विदेश दौऱ्याची माहिती सार्वजनिक करावी लागते. कोण खासदार कुठे जातो? कधी जातो? याबाबतची माहिती देणे गरजेचे असते. संसदीय मंत्र्यांनी जुलै 2019 मध्ये सर्व खासदारांना पत्र लिहून त्यांच्या विदेशी दौऱ्यांचा तपशील मागविला आहे. राहुल गांधींनाही याची माहिती द्यावी लागणार आहे, असेही जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी सांगितले.