रॉबर्ट वाड्रावरुन भाजपाचा सोनिया-राहुल गांधींवर हल्ला, काँग्रेस म्हणतेय - करा कोणतीही चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 08:26 AM2017-10-18T08:26:35+5:302017-10-18T09:52:24+5:30
भाजपानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत रॉबर्ट वाड्रा आणि शस्त्रास्त्रांचे व्यापारी संजय भंडारी यांच्या नातेसंबंधावरुन गांधी कुटुंबाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नवी दिल्ली - भाजपानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत रॉबर्ट वाड्रा आणि शस्त्रास्त्रांचे व्यापारी संजय भंडारी यांच्या नातेसंबंधावरुन गांधी कुटुंबानी साधलेल्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'टाइम्स नाऊ' वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, फरार असलेले शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारीनं 2012मध्ये परदेश दौ-यासाठी वाड्रांसाठी बिझनेस क्लासचं तिकीट बुक केले होते. दरम्यान, वाड्रा यांनी यावर अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, वाड्रा यांना गेल्या 41 महिन्यांपासून टार्गेट केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्षांच्या जावयाविरोधातील आरोपांसंदर्भात चुकीच्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी कोणतीही चौकशी करायची असल्यास त्यांनी करावी. दरम्यान, अनेकदा टार्गेट करुनही आतापर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झाल्याचे कोणतेही निष्कर्ष काढले गेलेले नाहीत, असेही सुरजेवाला यांनी यावेळी म्हटले.
काँग्रेसच्या मौनावर BJP चा सवाल
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी वाड्रा मुद्यावरुन काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला. सीतारमण यांनी असे म्हटले की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी साधलेले मौन पाहता त्यांनी वाड्रांविरोधातील आरोप स्वीकारल्याचे मानले जात आहे. प्रसिद्ध माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांचा हवाला देत सीतारमण यांनी आरोप केला की, लंडनमधील वाड्रांच्या घरातील सामान-सुमान भंडारीनंच दिले आहे आणि त्यानंच वाड्रांच्या परदेश यात्रेची व्यवस्थाही केली. दरम्यान भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं असा दावादेखील केला आहे की, भंडारीच्या बँक खात्यात 7.5 लाख स्विस फ्रँक (चलन) जमा करण्यात आले होते. वाड्रा यांच्या घरातील सजावट-देखभालीवर करण्यात आलेल्या खर्चाचा काही संबंध आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मीडिया रिपोर्टाचा उल्लेख करत संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोप केला की, यादरम्यान कमीत-कमी तीन वेळा देवाणघेवाण करण्यात आली आणि हा प्रकार गंभीर आहे. यावर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासहीत काँग्रेसनं का मौन साधलंय?,असा प्रश्नही सीतारमण यांनी यावेळी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्याकडून वारंवार करण्यात येणा-या ट्विटचा उल्लेख करत सीतारमण यांनी म्हटले की, या मुद्यार राहुल गांधींनी मौन का साधलं आहे?.
फेसबुकवर वाड्रांची पोस्ट
दरम्यान, वाड्रा यांनी आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र फेसबुकवर एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. सुप्रभात, मी सक्षम आहे, माझा स्वतःवर विश्वास आहे. मी आपल्या स्वप्नांना योजनेत बदलू शकतो आणि आपल्या योजनांना प्रत्यक्षात आणू शकतो.