नवी दिल्ली - भाजपा नेते राजू बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. मात्र याच दरम्यान त्यांनी पोलिसांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. "राज्यातील पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. बंगालमध्ये भाजपाचं सरकार आलं तर पोलिसांना बूट चाटायला लावू" असं राजू बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. मंगळवारी दूर्गापूरमध्ये एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
"सध्या पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे ते पाहा. राज्यात गुंडा राज असलेलं तुम्हाला पाहिजे का? पोलीस कुठलीही मदत करायला तयार नाहीत. अशा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काय करायला पाहिजे? आम्ही त्यांना बूट चाटायला लावू" असं भाजपा नेते राजू बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही असा आरोप करत आंदोलन छेडलं आहे. दरम्यान, भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यात सर्वात वाईट स्थिती असल्याचं म्हटलं आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री आहेत पण याच राज्यात महिला सुरक्षित नाहीत. इतर राज्यांच्या तुलनेत बंगालमध्ये महिलांची सुरक्षितता आणि सुरक्षा वाईट बनली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी एका जाहीर सभेमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट हात-पाय तोडण्याची धमकी दिली होती. तसेच कार्यकर्त्यांमध्ये सुधारणा झाली नाही तर त्यांना थेट स्मशानात पाठवू असं म्हटलं होतं.
"हात-पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात पाठवू"; भाजपा नेत्याची जाहीर धमकी
भाजपा नेत्याने भर सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याने नवा वाद निर्माण झाला होता. "तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी थांबवावी नाही तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. सुधारणा झाली नाही तर अशा कार्यकर्त्यांचे हात, पाय तोडू आणि डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही. या कार्यकर्त्यांना घरी पाठवण्याऐवजी रुग्णालयामध्ये पाठवू. जर यानंतरही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर थेट त्यांना स्मशानातच पाठवू" अशी धमकी दिलीप घोष यांनी दिली होती.