नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी "देशात बेरोजगारी वाढतेय, महागाई वाढत चालली आहे. परंतु संसदेत यावर चर्चा होऊ दिली जात नाही. देशात ७० वर्षात निर्माण झालेली लोकशाही गेल्या ८ वर्षात संपवली आहे. लोकांसमोर जे सत्य आहे ते उघड व्हायला हवं. मी जेवढे सत्य लोकांसमोर आणेन तेवढं माझ्यावर हल्ला केला जाईल. लोकांचा मुद्दा उचलण्याचं काम मी करत राहणार आहे. जो धमकावतो तोच घाबरलेला असतो" अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पण आता भाजपानेही राहुल गांधींच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपा नेते रविशंकर प्रसाद (BJP Ravi Shankar Prasad) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधींना विचारला आहे. तसेच लोकशाहीचा सल्ला देणाऱ्या राहुल गांधींच्याच आजीने मीडियावर बंदी घातली होती. काँग्रेसमध्ये चांगले नेते आहेत. पण तुमच्या पक्षात लोकशाही आहे का? हा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधींचा पक्ष आहे. जनतेने तुम्हाला नाकारले, याला आम्ही जबाबदार कुठून? असा सवालही रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना विचारला आहे.
"काँग्रेस एकाच कुटुंबाच्या खिशात, हे कुटुंब पक्षाची मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतंय"
रविशंकर प्रसाद म्हणाले की, "काँग्रेसची लोकशाही ही भ्रष्टाचाराची व्यवस्था आहे. भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी राहुल गांधी टीका करत आहेत. राहुल गांधी जामिनावर का बाहेर आहेत? काँग्रेस पक्ष आज एकाच कुटुंबाच्या खिशात आहे. हे कुटुंब आता पक्षाची मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपूर्वी सभागृहात चर्चा झाली तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी त्यात सहभाग घेतला नाही. महागाई आणि बेरोजगारीची चर्चा हे निमित्त आहे. योग्य कारण म्हणजे ईडीला घाबरवणे, धमकी देणे आणि कुटुंबाला वाचवणे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी जितकं जनतेचे मुद्दे उचलणार, महागाई, बेरोजगारी यावर बोलणार तितके माझ्यावर आक्रमण केले जाणार आहे. माझ्यावर जितके आक्रमण होईल तितकाच जास्त मला फायदा होणार आहे. मी आक्रमणांना घाबरणार नाही. देशात लोकशाहीची हत्या झाली आहे. जी लोकशाही ७० वर्षात आम्ही बनवली ती ८ वर्षात संपवली आहे. देशात आजच्या घडीला लोकशाही नाही. केवळ ४ लोकांची हुकुमशाही आहे. जनतेच्या मुद्द्यावर बोलायला लागल्यावर आम्हाला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते असा आरोप राहुल गांधींनी केला.