नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरू झाली आहे. या यात्रेकडून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत. सत्तेचा सर्वोच्च शिखर अनुभवलेल्या काँग्रेसची आज दयनीय अवस्था झाली आहे, देशभरात पक्ष अंतर्गत आणि बाह्य संघर्षाचा सामना करत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना (Congress Rahul Gandhi) या यात्रेतून मोठ्या आशा आहेत. सुमारे 3,500 किमी लांबीची ही भारत-जोडो यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे. याच दरम्यान भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
"भारत जोडो यात्रा" या मोहिमेवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. भारत जोडो यात्रा म्हणजे गांधी घराण्याची कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे अशा शब्दांत बोचरी टीका केली. तसेच पक्षावर गांधी कुटुंबाचे नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राहुल गांधी यांना नेता म्हणून स्थापित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे असं टीकास्त्रही सोडलं आहे. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
"राहुल गांधींना पक्षाचा प्रमुख नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न"
"सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला सोडून जात असताना राहुल गांधी स्वत: पक्षाचे एकीकरण करू शकले नाहीत आणि ते आता भारत जोडो मोहीम चालवत आहे. ही एक कुटुंब वाचवण्याची मोहीम आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात असताना कुटुंबाचा आणि पक्षाचा राजकीय विस्तार कमी होत चालला आहे. हे देशाला एकत्र आणण्यासाठी नाही तर राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचा प्रमुख नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे" असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या यात्रेत 58-25चा कॉम्बो
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्यासोबत या मोहिमेत सुमारे 100 कार्यकर्ते असून. विजेंदर सिंग महलावत हे भारत जोडो यात्रेतील काँग्रेसचे सर्वात वयस्कर नेते असतील, त्यांचे वय 58 वर्षे आहे. महलावत हे राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यात्रेतील सर्वात तरुण कार्यकर्ते म्हणजे अजम जांबोला आणि बेम बाई. दोघेही 25 वर्षांचे असून, ते अरुणाचल प्रदेशचे आहेत. अशाप्रकारे राहुल गांधींच्या या यात्रेत 58-25चा कॉम्बो पाहायला मिळणार आहे. पदयात्रा 11 सप्टेंबरला केरळला पोहोचेल आणि पुढील 18 दिवस राज्यातून प्रवास करून 30 सप्टेंबरला कर्नाटकात पोहोचेल. ही यात्रा कर्नाटकात 21 दिवस चालेल आणि नंतर उत्तरेकडे इतर राज्यांमध्ये जाईल.