- संजय शर्मानवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी निवडणूक प्रभारींची घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना तेलंगणाचे निवडणूक प्रभारी करण्यात आले असून, राजस्थानची सूत्रे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हाती देण्यात आली आहेत. मध्य प्रदेशात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व छत्तीसगडमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश माथुर निवडणुकीची जबाबदारी सांभाळतील.
यात सर्वांत आश्चर्यकारक नियुक्ती प्रकाश जावडेकर यांची आहे. त्यांना मंत्रिपदावरून हटवून भाजपने केरळचे प्रभारी केले होते. ते तेलंगणाचे प्रभारीही राहिलेले आहेत व तेलंगणाच्या राजकारणाशी चांगल्या पद्धतीने परिचित आहेत. त्यांच्या याच अनुभवाचा फायदा भाजपला घ्यायचा आहे. प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, तेलंगणात भाजपची लढाई भ्रष्टाचाराविरोधात आहे. या मुद्यांवर भाजप जनतेत जाणार आहे.
राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना पूर्णपणे मोकळीकभाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने वसुंधरा राजे यांना विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे मोकळीक देण्याचे ठरवले आहे. वसुंधरा राजे विरोधी गटातील गुलाबचंद कटारिया यांची भाजपने यापूर्वीच राज्यपालपदी नियुक्ती करून वसुंधरा राजे यांच्यासाठी मैदान मोकळे करून दिले आहे.