भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; काँग्रेसला किती मिळाली? कुठल्या क्रमांकावर आम आदमी पार्टी? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:41 IST2025-04-07T19:40:27+5:302025-04-07T19:41:05+5:30
राष्ट्रीय पक्षांना मिळालेली एकूण घोषित देणगी २५४४.२८ कोटी रुपये आहे, जी १२५४७ देणगीदारांकडून मिळाली.

भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; काँग्रेसला किती मिळाली? कुठल्या क्रमांकावर आम आदमी पार्टी? जाणून घ्या
भारतीय जनता पक्षाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक म्हणजेच २२४३ कोटी रुपयांहूनही अधिक देणगी मिळाली आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांचा विचार करता हा आकडा सर्वाधिक आहे. निवडणुकीशी संबंधित संघटना 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) ने त्यांच्या अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे. या आकडेवारीत २० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या राजकीय देणग्यांची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय पक्षांना मिळालेली एकूण घोषित देणगी २५४४.२८ कोटी -
राष्ट्रीय पक्षांना मिळालेली एकूण घोषित देणगी २५४४.२८ कोटी रुपये आहे, जी १२५४७ देणगीदारांकडून मिळाली. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा १९९ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण घोषित देणग्यांपैकी ८८ टक्के देणगी एकट्या भाजपकडे आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना १९९४ देणग्यांमधून २८१.४८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.
भाजप पहिल्या क्रमांकावर -
आम आदमी पार्टी (आप), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) यांनी कमी रकमेची माहिती दिली. तर बहुजन समाज पार्टीने (बसपा) पुन्हा एकदा गेल्या १८ वर्षांच्या त्यांच्या दाखल केलेल्या आकड्यांप्रमाणेच २०,००० रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिकच्या देणग्या नसल्याचे जाहीर केले आहे.
काँग्रेसच्या देणगीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २५२.१८ टक्के वाढ -
भाजपला मिळाणारी देणगी आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या ७१९.८५८ कोटी रुपयांवरून वाढून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २,२४३.९४ कोटी रुपये झाली. अर्थात २११.७२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. याचप्रमाणे, काँग्रेसला मिळालेली देणगी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मिळालेल्या ७९.९२४ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २८१.४८ कोटी रुपयांपर्यंत वाढली, यात २५२.१८ टक्क्यांची वाढ दिसून येते.