मुंबई: सत्ताधारी भाजपावर कॉर्पोरेट विश्व चांगलंच मेहेरबान झाल्याचं दिसतं आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत भाजपाला ९१५.५९ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाली आहे. विशेष म्हणजे भाजपाला मिळालेल्या देणग्यांची रक्कम काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांच्या तब्बल १६ पट आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली. २०१६ ते २०१८ या कालावधीत १,७३१ कॉर्पोरेट्सनी भाजपाला ९१५.५९ कोटी रुपये देणगी रुपात दिले. २०१७ आणि २०१८ या आर्थिक वर्षांमध्ये देशातील सहा राष्ट्रीय पक्षांना एकूण १०५९.२५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. यातील ९३ टक्के देणग्या कॉर्पोरेट्सकडून आल्या आहेत. यामधील सर्वाधिक रक्कम भाजपाला मिळाली. तर देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला केवळ ५५.३६ कोटींच्या देणग्या मिळाल्या. सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या पक्षांच्या यादीत राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानी आहे. त्यांना मिळालेल्या देणग्यांची रक्कम ७ कोटींहून अधिक आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन झालं. भाजपानं २०१३ मध्येच नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केलं. त्याच आर्थिक वर्षापासून भाजपाला सर्वाधिक देणग्या मिळू लागल्या. २०१३ ते २०१८ या कालावधीत भाजपाला तब्बल १,६२१.४० कोटी रुपये इतकी रक्कम कॉर्पोरेट्सकडून देणग्यांच्या स्वरुपात मिळाली. देशातील राष्ट्रीय पक्षांना याच काळात कॉर्पोरेट्सकडून मिळालेल्या देणग्यांचा विचार केल्यास, ही रक्कम ८३.४९ टक्के इतकी आहे.
भाजपावर कॉर्पोरेट्स मेहेरबान; सत्ताधारी पक्षाच्या पदरात तब्बल ९१५ कोटींचं दान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 9:48 AM