सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियानं इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व डेटा जारी केला. भारतीय निवडणूक आयोगानं यासंदर्भातील ती यादीही प्रसिद्ध केली. दरम्यान, ४८७ डोनर्सनं इलेक्टोरल बॉन्डद्वारे भारतीय जनता पक्षाला देणगी दिली असल्याचं या नव्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बॉन्डद्वारे तब्बल ६,०६० कोटी रुपयांची देणगी मिळाली. पक्षाला सर्वाधिक देणगी देणाऱ्या टॉप १० डोनर्सनं २,११९ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. भाजपला मिळालेल्या एकूण देणगीपैकी तब्बल ३५ टक्के देणगी टॉप १० डोनर्सनं दिली आहे.
'फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस लिमिटेड'नं सर्वाधिक इलेक्टोरल बाँड्स खरेदी केले होते. कंपनीनं एकूण १,३६८ कोटी रुपयांचे बॉन्ड्स दिले होते. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, या कंपनीनं भाजपला १०० कोटी रुपयांचा निधी दिला. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि द्रमुकलाही देणग्या देण्यात आल्यात. फ्युचर गेमिंग कंपनीनं तृणमूल काँग्रेसला ५४२ कोटी रुपये आणि डीएमकेला ५०३ कोटी रुपयांचा देणगी दिली.
टॉप १० मध्ये आणखी कोण?
टॉप-१० च्या यादीत मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना देणगी दिली आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रानं १,१९२ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले. त्यांना काँग्रेसला ११० कोटी रुपये तर भाजपला जवळपास पाचपट देणगी दिली. मेघा ग्रुपकडून भाजपला ५८४ कोटी रुपयांचा निधी मिळाला. या कंपनीकडून भाजपला सर्वाधिक देणगी मिळाली आहे.
इलेक्टोरल बाँड्सद्वारे जास्तीत जास्त देणगी देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एमकेजे ग्रुप (MKJ) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीचं मुख्यालय कोलकात्यात आहे. यांनी एकून ६१७ कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले होते. परंतु त्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच ३७२ कोटी भाजपला देण्यात आले. तर काँग्रेसला १६१ कोटी आणि तृणमूल काँग्रेसला ४७ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली.
टॉप १० कंपन्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आरपीएसजी समूह आहे. या समूहातील ८ कंपन्यांनी ५८४ कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले होते. या समूहापैकी हल्दिया एनर्जीनं ३७७ कोटी रुपये, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरनं ११५ कोटी, फिलिप्स कार्बननं ३५ कोटी आणि क्रिसेंट पॉवरनं ३४ कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले होते. या चार कंपन्यांनी मिळून ५६१ कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले. त्यांच्याकडून टीएमसीला सर्वाधिक ४१९ कोटी रुपये, भाजपला १२६ कोटी रुपये आणि काँग्रेसला १५ कोटी रुपये मिळाले.
आदित्य बिर्ला समूहाकडून ५५३ कोटी
या यादीतल सर्वात मोठा पाचवा देणगीदार आदित्य बिर्ला समूह आहे. या समूहातील प्रमुख तीन कंपन्यांनी ४७५ कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले होते. एस्सेल मायनिंगनं २२५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स, उत्कल ॲल्युमिना इंटरनॅशनलनं १४५ कोटी रुपयांचे आणि बिर्ला कार्बननं १०५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले होते.
RPSG ग्रुपने एकूण 553 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. यापैकी बीजेडीला 245 कोटी रुपये आणि भाजपला 230 कोटी रुपये मिळाले. या समूहातील प्रमुख तीन देणगीदार कंपन्यांनी 475 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले होते. एस्सेल मायनिंगने 225 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉण्ड्स, उत्कल ॲल्युमिना इंटरनॅशनलने 145 कोटी रुपयांचे आणि बिर्ला कार्बनने 105 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले होते.
वेदांता आणि भारती समूहाकडूनही देणगी
या यादीतील पुढील नाव म्हणजे क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड. ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे. या कंपनीनं इलेक्टोरल बॉन्ड्सवर ४१० कोटी रुपये खर्च केले. यापैकी भाजपला ३७५ कोटी आणि शिवसेनेला २५ कोटी रुपये दिले.
सर्वाधिक बॉन्ड्स खरेदी करणाऱ्यांच्या यादीत वेदांता लिमिटेड सातव्या स्थानी आहे. या कंपनीनं ४०१ कोटी रुपयांचे बॉन्ड्स घेतले. याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला असून त्यांना २२७ कोटी, काँग्रेसला १०४ कोटी आणि बीजेडीला ४० कोटी रुपये मिळाले. भारती समूहाच्या चार कंपन्यांनी २४७ कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले होते. यापैकी भाजपला १९७ कोटी रुपये मिळाले. दरम्यान समूहाची कंपनी भारती एअरटेल लिमिटेडनं १८३ कोटी रुपये खर्च केले.
जिंदाल आणि टोरंट समूहाकडूनही देणग्या
जिंदाल ग्रुपच्या चार कंपन्यांनी १९२ कोटी रुपयांचे बॉन्ड्स दान केले. १९२ कोटींपैकी बीजेडीला सर्वाधिक १०० कोटी रुपये मिळाले. काँग्रेसला २० कोटी आणि भाजपला २ कोटी रुपये मिळाले. यातील सर्वाधिक खरेदीदार जिंदाल स्टील अँड पॉवर होती. त्यांनी तब्बल १२३ कोटी रुपये खर्च केले.
या यादीतील टॉप १० मधील १० वी कंपनी म्हणजे अहमदाबादचा टोरंट ग्रुप. या समूहाच्या तीन कंपन्यांनी १८४ कोटी रुपयांचे बॉन्ड्स दान केले. यातून भाजपला १०७ कोटी, काँग्रेसला १७ कोटी आणि आम आदमी पक्षाला ७ कोटी रुपये मिळाले. या समूहातील टोरेंट पॉवर लिमिटेडने सर्वाधिक १०७ कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले होते.