कानपूर - उत्तर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये कानपूरमधील लढाई रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. कारण भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुनेला तिकीट देण्यास नकार दिला आहे. भाजपाने तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या दिपा कोविंद यांनी आता अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. दिपा कोविंद या रामनाथ कोविंद यांच्या सून आहेत. नगर समिती अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज केला असून भाजपाच्या सरोजिनी देवी कोरी यांच्याशी त्यांची स्पर्धा असणार आहे.
दिपा कोविंद या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा पुतण्या पंकज कोविंद यांच्या पत्नी आहेत. भाजपाने आपल्यासोबत योग्य केलं नसल्याचं पंकज कोविंद बोलले आहेत. आपण पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली. आपल्या पत्नीलाच भाजपा उमेदवारी देईल असा विश्वास पंकज सिंग यांना होता. पण जेव्हा भाजपाने आपली उमेदवार यादी जाहीर केली तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला. त्यांच्या पत्नीचं नाव यादीत नव्हतं. ते बोलले की, 'भाजपाने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांना ना पक्षाची लोक ओळखतात, ना लोकांमध्ये त्यांची काही स्वतंत्र ओळख आहे'.
झिंझक नगरपालिका अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित असल्याने येथून उमेदवारी मिळावी या अपेक्षेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वहिनी विद्यावती आणि सून दिपा कोविंद यांनी भाजपाशी संपर्क साधला होता. पण भाजपाने त्यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत सरोजिनी देवी कोरी यांना नगर समिती अध्यक्षपदासाठी उमेदवार केलं आहे.
आपल्या तिकीट न मिळाल्याने आपण उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचं विद्यावती यांनी सांगितलं आहे. तर दिपा कोविंद यांचे पती पंकज यांनी सांगितलं आहे की, 'आपल्या पत्नीने निवडणुकीसाठी खूप मेहनत घेतली आहे. स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेता त्यांच्या कुटुंब आणि मित्रांनी दिपा कोविंद यांना अपक्ष म्हणून उभं करण्याचा निर्णय घेतला'.
गुरुवारी दिपा कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने येथून मीरा देवी आणि समाजवादी पक्षाने रामादेवी यांना उमेदवारी दिली आहे. ट्रान्सजेंडर कामिनी किन्ररदेखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत.