राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 03:42 PM2019-03-13T15:42:42+5:302019-03-13T15:46:48+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमधील वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर लगेचच विविध राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराची रणनिती तयार करत आहे. ही रणनिती आखत असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातेत केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच त्या संदर्भात तक्रार देखील देण्यात आली आहे.
केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगासमोर आपले म्हणणे मांडले. रविशंकर प्रसाद म्हणाले की, बंगालमध्ये होणाऱ्या हिंसक घटनांमुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत. यापुढे देखील हिंसक घटना होण्याची शक्यता असून संपूर्ण पश्चिम बंगाल राज्याला अतिसंवेदनशील राज्य घोषित करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावे आणि बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माध्यमांना प्रवेश मिळावा, अशी मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
Union Minister Ravi Shankar Prasad after BJP delegation meeting with Election Commission in Delhi today: We've requested EC to take action against Rahul Gandhi for levelling unverified allegations against PM y'day in Ahmedabad, when the Model Code of Conduct is already in effect. pic.twitter.com/aCiM0aOgUI
— ANI (@ANI) March 13, 2019
राहुल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी अहमदाबाद येथील जाहीर सभेत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी राफेल करारातील पैशाने उद्योगपती अनिल अंबानी यांचे खिसे भरले. राहुल यांच्या या वक्तव्याची भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच याची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी असंही तक्रारीत म्हटले आहे.
राहुल गांधी यांचे वक्तव्य
राहुल गांधी म्हणाले होते की, 2014 मधील निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्याला पंतप्रधान नव्हे तर चौकीदार बनवा असे म्हटले होते. हेच मोदी प्रत्येक व्यासपिठावर देशभक्तीविषयी बोलतात. वायुसेनेचे कौतुक करतात. परंतु वायुसेनेचे 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात का घातले, याविषयी मोदी काहीही बोलत नाही.