भोपाळ : भाजपने आज मध्यप्रदेशसह मिझोराम आणि तेलंगणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मध्य प्रदेशमध्ये भाजपने 177 उमेदवारांची यादी दिली. यामध्ये तब्बल 35 आमदारांना घरी बसविले आहे.
शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री राहिलेली माया सिंह यांचा ग्वाल्हेर मतदारसंघातून पत्ता कापला गेला आहे. त्यांच्या जागी खासदार सतीश सिकरवार यांना तिकिट देण्यात आले आहे. माया या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मामी आहेत. याचबरोबर मुरैनाहून रुस्तम सिंह, श्योपुरहून दुर्गालाल, लहारहून रशल सिंह यांना तिकिट मिळाले आहे. याचबरोबर वादग्रस्त पार्श्वभुमी असेलेले नरोत्तम मिश्रा यांना दतियाहून तिकीट देण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांच्या गोविंदपुरा आणि माजी मंत्री कैसाश विजयवर्गीय यांच्या महू मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
मंत्री हर्ष सिंह यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे अर्धा डझन महिला आमदारांना पुन्हा तिकिट नाकारण्यात आल् असू भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तीन अपक्ष आमदारांना तिकिट देण्यात आले आहे. अद्याप 53 जागांवरील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.