BJP Candidate List: जम्मू कश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 29 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपने तिसरी यादी प्रसिद्ध केली असून, यात दुसर्या टप्प्यातील निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील १० उमेदवार, तर १९ उमेदवार तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील आहेत.
जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४४ उमेदवारांची यादी सोमवारी (26 ऑगस्ट) प्रसिद्ध केली होती. पण, काही वेळातच ही यादी मागे घेण्यात आली. त्यानंतर भाजपची वरिष्ठ पातळीवर दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात १५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या यादीत एका उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले होते.
तिसऱ्या यादीत 29 उमेदवारांच्या नावांचा समावेश
२७ ऑगस्ट रोजी दुपारी भाजपकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. २९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, श्री माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघातून बलदेव राज शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या यादीत या मतदारसंघातून रोहित दुबे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
पहिली यादी का करावी लागली रद्द
भाजपने पहिली ४४ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांचा विरोध झाला होता. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनाच उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे नाराज नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध झाला. त्यामुळे पहिली यादी रद्द करून भाजपला नव्याने उमेदवारांच्या नावाची घोषणा करावी लागली.
तीन टप्प्यात होणार निवडणुका
जम्मू कश्मीरमध्ये ९० जागांसाठी निवडणूक होत आहे. १८ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. संवेदनशील भाग असल्याने तीन टप्प्यात निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.