नवी दिल्ली : भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहे. दरम्यान, भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या एक्स हँडलवरून एक पोस्टर जारी करण्यात आले आहे. यामध्ये भाजपने राहुल गांधी यांचे 'फ्यूज ट्यूबलाइट' असे वर्णन केले आहे. पोस्टरमध्ये वरच्या कोपऱ्यात 'काँग्रेस प्रेझेंट्स' लिहिलेले आहे, तर त्यानंतर 'मेड इन चायना' असेही लिहिले आहे.
याशिवाय, पोस्टरमध्ये खाली मोठ्या अक्षरात 'राहुल गांधी इन अँड एज ट्यूबलाइट' असे लिहून भाजपने काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाइट या चित्रपटाच्या पोस्टरनुसार हे पोस्टर एडिट करून डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये सलमान खानच्या जागी राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला आहे. यासोबतच, भाजपने पोस्टरमध्ये 'काँग्रेस प्रेझेंट्स, मेड इन चायना, राहुल गांधी अँड एज ट्यूबलाइटमध्ये' असे म्हटले आहे.
याआधीही भाजप आणि काँग्रेसमध्ये अशी प्रकरणे पाहायला मिळाली आहेत. नुकतेच राहुल गांधी आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'पनवती', 'खिसेकापू' असा उल्लेख केल्याने राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
नुकत्याच झालेल्या राजस्थानमधील निवडणूक प्रचारामध्ये पंतप्रधानांना लक्ष्य करून राहुल गांधी यांनी ही टीका केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग १० विजयांनंतर अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या सामन्याच्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होते. या घटनेचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी राजस्थानमधील प्रचारसभेत मोदींचा उल्लेख पनवती असा केला होता. तर, 'पंतप्रधान लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवतात आणि उद्योगपती गौतम अदानी त्यांचे खिसे भरतात. अशा प्रकारे पाकीटमारी चालते', अशी टीका राहुल गांधी यांनी बुधवारी प्रचारसभेत केली होती.