चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मर्लोना आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पराभूत करण्याची जबाबदारी भाजपने दोन माजी खासदारांच्या खांद्यावर टाकली आहे. आतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुडी यांना तर केजरीवालांच्या विरोधात प्रवेश वर्मा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र, गांधीनगरच्या विद्यमान आमदाराचे तिकीट भाजपने कापले आहे.
भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीतील २९ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने नवी दिल्ली मतदारसंघातून माजी खासदार प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले आहे. तर, मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्या विरोधात माजी खासदार रमेश बिधुडी यांना कालकाजी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. गांधीनगरचे विद्यमान आमदार अनिल वाजपेयी यांना तिकीट नाकारले असून आपच्या दोन बंडखोरांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
यात कैलाश गहलोत आणि राजकुमार आनंद यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून आलेले अरविंदर सिंग लवली यांना पक्षाने गांधीनगरमधून उमेदवारी दिली आहे. राजौरी गार्डन मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा हे उमेदवार असतील. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या विरोधात भाजपने जंगपुरामधून तरविंदर सिंग मारवाह यांना तिकीट दिले आहे. आम आदमी पक्षाने सर्व ७० तर काँग्रेसने ४७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्याविरोधात काँग्रेसने अल्का लांबा यांना उमेदवारी दिली आहे.
आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांमध्ये लढत
- नवी दिल्ली मतदारसंघात आता तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात लढत होण्याची चिन्हे आहेत. आप प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.
- काँग्रेसने दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना तर भाजपने दिवंगत माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले आहे.