नवी दिल्ली - २६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याविरोधात राजकीय क्षेत्रासोबतच समाजातील सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी व्यक्त केलेल्या विधानाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून, प्रज्ञा सिंह यांचे ते वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपानेभोपाळ येथून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगात असताना झालेल्या छळाचा उल्लेख करताना ."हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला," असे धक्कादायक विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. त्यावरून आज सकाळपासून मोठा वाद निर्माण झाला असून, प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजपाला जाब विचारण्यात येत होता.
दरम्यान, अखेर आज भाजपाने याबाबत एक पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हेमंत करकरे हे दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झाले आहेत, असे भाजपाचे स्पष्ट मत आहे. भाजपाने करकरे यांना नेहमीच शहीद मानले आहे. हेमंत करकरेंबाबत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. अनेक वर्षांपासून झालेला शारीरिक आणि मानसिक छळामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असावे, असा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.