किरण बेदींना हटवून भाजपने काढली काँग्रेसच्याच पायाखालची चादर, काँग्रेसला सहानुभूती मिळणे अवघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:36 IST2021-02-18T03:23:42+5:302021-02-18T06:36:15+5:30
Kiran Bedi : राज्यातील काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याने नारायणस्वामी सरकार अल्पमतात आले आहे. किरण बेदी यांनीच हे घडवून आणले, अशी टीका काँग्रेस करीत आहेत.

किरण बेदींना हटवून भाजपने काढली काँग्रेसच्याच पायाखालची चादर, काँग्रेसला सहानुभूती मिळणे अवघड
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल पदावरून किरण बेदी यांना हटविताना त्याचा काँग्रेसला फायदा मिळू नये, अशी व्यवस्था मोदी सरकारने केली आहे. सरकारच्या कामात निष्कारण हस्तक्षेप करणाऱ्या, सरकारला काम करू न देणाऱ्या किरण बेदी यांना दूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री नारायणस्वामी नेहमीच करीत होते.
राज्यातील काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याने नारायणस्वामी सरकार अल्पमतात आले आहे. किरण बेदी यांनीच हे घडवून आणले, अशी टीका काँग्रेस करीत आहेत. त्यामुळे लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला सहानुभूती मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती.
याच कारणामुळे बेदी यांना हटवून काँग्रेसच्या पायाखालची चादर भाजपने काढली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी योग्य वेळी ही खेळी केली आहे. किरण बेदीच पदावर नसल्याने काँग्रेसला सहानुभूती मिळणे अवघड होईल. राज्यात निवडणुका असल्याने राहुल गांधी यांनी काही दिवसांत तेथील नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली. विश्वासातील नेते दिनेश गुंडू राव यांच्याकडे पुदुच्चेरीची जबाबदारी सोपविली. राहुल गांधी बुधवारी पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असल्याने त्याआधी एक दिवस बेदी यांना दूर करण्यात आले.
भाजपने पुदुच्चेरी निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल व राजीव चंद्रशेखर यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत दक्षिणेकडील हा लहानसा केंद्रशासित प्रदेश ताब्यात घेण्याचा अमित शहा व जे. पी. नड्डा यांचा प्रयत्न आहे.
काय आहे राजकारण?
तेलंगणाच्या राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांच्याकडे काही काळासाठी पुदुच्चेरीची जबाबदारी सोपविण्यातही राजकारण आहे. तामिळ भाषकांच्या पुदुच्चेरीत मूळ तामिळनाडूच्या सौंदरराजन काम पाहतील. नारायणस्वामी यांच्याप्रमाणेच सौंदरराजन याही नाडर समाजाच्या आहेत.