नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie नावाचा नवीन शब्द आला आहे. त्याचा स्क्रीनशॉट्स काढून ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. त्यावरुन पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध भाजपा संघर्ष पेटला आहे. राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती होत आहे. त्यामुळे राहुल मोठा हो असा टोला भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला आहे.
राहुल गांधी यांनी 24 तासापूर्वी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये नवीन राजकारणाची भाषा पुढे आणत मुद्द्यावरुन आणि विचारधारेवर निवडणुकीची लढाई लढू मात्र हिंसक आणि वेदनादायक प्रचार करु नये. ते देशाच्या राजकारणासाठी घातक आहे असं सांगितलं. मात्र 24 तास उलटल्यानंतर राहुल गांधींना याचा विसर पडला आहे. प्रचारातील खरे मुद्दे घेऊन चर्चा करण्याऐवजी त्यांनी केलेलं ट्विट मुर्खपणाचं आहे असा आरोप भाजपा प्रवक्ते जी.व्ही. एल नरसिंहराव यांनी केलं आहे.
राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा नवा शब्द समाविष्ट झाला असल्याचं ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटखाली त्यांनी Modilie या शब्दाचे काही अर्थ ही दिले आहेत. सत्याची सातत्याने मोडतोड करणे, सवयीने थापा मारणे, न थकता खोटं बोलणे असा अर्थ मोदी लाय या शब्दाचा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. या आधीही राहुल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर टीका करताना 'Jaitlie' शब्द वापरला होता.
उज्जैनमधल्या लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार बाबुलाल मालवीय यांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी म्हणाले होते. आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही. भारतातील सर्वच लोक आमचे आहेत. मोदी नेहमीच द्वेषानं बोलतात. माझ्या वडिलांचा अपमान करतात. आजी आणि पणजोबांबद्दल वाईट वाईट बोलतात. तरीसुद्धा मी कधीही त्यांच्या कुटुंबीयांबद्दल वाईट बोलणार नाही. त्यांच्या आई-वडिलांबाबत अपशब्द काढणार नसल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं आहे. मी आरएसएस आणि भाजपाचा माणून नाही. मी काँग्रेसचा माणूस आहे. मोदींनी माझा जेवढा द्वेष केला आहे, त्याला मी प्रेमानं उत्तर देणार आहे. मी त्यांची गळाभेट घेऊन त्यांना प्रेम शिकवेन, याचा उल्लेखही राहुल गांधींनी आवर्जून केला होता.