पाटणा : बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला भाजपमुळे उशीर होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. या आधी मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब कधीच झाला नव्हता, असेही ते म्हणाले.
नितीशकुमार यांनी सांगितले की, या आधीही मी सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करत असे, पण यावेळी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर सरकार स्थापन होऊन बरेच दिवस उलटले, पण मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सध्या बिहार मंत्रिमंडळात फक्त चौदाच मंत्री आहेत.
भेटी-गाठी सुरूभाजपचे बिहारसाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव व प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी गुरुवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.