लखनऊ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा यांच्यामुळेच हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान झाले, अशी टीका शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी केली. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले. त्यांनी म्हटले की, सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदू धर्माची बिलकूल जाण नाही. भागवत म्हणतात की, हिंदूंमध्ये लग्न हा एक सामंजस्य करार आहे. परंतु तसे नसून लग्न म्हणजे संपूर्ण आयुष्याची सोबत आहे. तसेच भागवत केवळ भारतात जन्माला आलेल्या लोकांनाच हिंदू मानतात. तसे असेल तर इंग्लंड किंवा अमेरिकेतील हिंदू मातापित्याच्या पोटी जन्माला येणाऱ्यांचे काय, असा सवाल शंकराचार्य यांनी विचारला. गोमांस निर्यात करण्यामध्ये भाजपाचे नेते अग्रेसर आहेत, भाजपाचे खायचे दात एक आणि दाखवायचे वेगळे आहेत. काश्मीरमध्ये कलम ३७० संपलं का ? तरुणांना रोजगार मिळाला का? पंतप्रधान मोदींनी दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा झाले काय? अयोध्येत राम मंदिर झालं का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार शंकराचार्यांनी केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपा सरकार राम मंदिर उभारू शकत नाही, असे म्हटले होते. घटनेनुसार केंद्र सरकार हे निधर्मी आहे. परिणामी हे सरकार राम मंदिर, मशिद किंवा गुरुद्वारा उभारू शकत नाही. केवळ आमच्यासारखे रामभक्तच राम मंदिर बांधण्यास समर्थ आहेत, असे शंकराचार्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता भाजपा या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संघ आणि भाजपामुळेच हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान झाले- शंकराचार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 11:12 AM