ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २६ - उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक लढवणा-या सर्व प्रमुख पक्षांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला असताना भाजपाने मात्र अद्याप यासंबंधी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार भाजपही लवकरच आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करु शकते.
उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी भाजपने आपली सर्व शक्तीपणाला लावली आहे. भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी आपला वैचारीक मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेत असून, गुरुवारी रात्री पक्षाध्यक्ष अमित शहा आणि आरएसएस नेते भय्याजी जोशी यांच्यामध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
संपूर्ण प्रचार नरेंद्र मोदींभोवती केंद्रीत ठेवण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करुन निवडणूक लढवली तर, जास्त फायदा होईल या तर्कापर्यंत भाजपा पोहोचला आहे. पुढच्या टप्प्यात भाजप आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासंबंधी मते जाणून घेणार आहे. त्यानंतर उमेदवार निवडीचा निर्णय होऊ शकतो.
काँग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित, बसपकडून मायावती आणि सत्ताधारी समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. मात्र अंतर्गत गटबाजीच्या शक्यतेमुळे भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदींभोवती केंद्रीत ठेवला होता. त्याचा फटका भाजपला बसला. त्यानंतर आसाममध्ये भाजपने सरबानंद सोनोवाल यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले. ज्याचा फायदा पक्षाला तिथे झाला आणि भाजपचे सरकार तिथे आले. उत्तरप्रदेशमध्येही भाजप त्याच रणनितीने जाऊ शकतो.