राज्यासह केंद्रात 50 वर्ष सत्तेत राहू; भाजपा नेत्याला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 07:37 AM2019-06-24T07:37:41+5:302019-06-24T07:40:03+5:30
अमित शहा, राम माधव यांनीही 50 वर्ष सत्तेत राहू असा दावा केला होता
लखनऊ: राज्यासह केंद्रात 50 वर्षे राज्य करू, असा विश्वास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला. पुढील 50 वर्षे कोणताही पक्ष भाजपाला सत्तेतून हटवू शकणार नाही. उत्तर प्रदेशात तर समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि कांग्रेसला कोणतंही भविष्य नाही. कारण या पक्षांनी मागासवर्गीय जातींना कधीच सन्मान दिला नाही, असं मौर्य यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अखिलेश यादव मागासवर्गीयांचे नव्हेत, तर केवळ यादव जातीतल्या एका वर्गाचे नेते आहेत. त्यांनी केवळ त्या वर्गाचा वापर केला, असा आरोप मौर्य यांनी केला. लोकसभा निवडणूक संपताच सपा आणि बसपाची महाआघाडी संपुष्टात आली. त्यावरुनही मौर्य यांनी टोला लगावला. 'निवडणूक संपताच दोघांनी कट्टी घेतली. एक भाच्यावर नाराज आहेत, तर दुसरा आत्येवर खट्टू झाला आहे. हे दोन पक्ष एकत्र असताना भाजपाला रोखू शकले नाहीत. मग आता एकटे असताना काय करणार?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अमेठीत उमललेलं कमळ राज्यातली काँग्रेस संपल्याचं चिन्ह असल्याचंही ते पुढे म्हणाले.
मौर्य यांच्या आधी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि महासचिव राम माधव यांनीदेखील पक्ष पुढील 50 वर्षे सत्तेत असेल, असा विश्वास व्यक्त केला होता. आपण 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकलो, तर 50 वर्षे सत्तेत राहू, असं शहांनी सप्टेंबर 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारणीला संबोधित करताना म्हटलं होतं. तर राम माधव यांनी त्रिपुराची राजधानी अगरताळामध्ये एका रॅलीला संबोधित करताना पक्ष 2047 पर्यंत सत्तेत राहील, असा दावा केला होता.