नवी दिल्ली - दिवाळीत अनेक ठिकाणी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि कोरोना रुग्णांना असणारा त्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव मतदार संघातील खासदार आणि भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. "ज्या वर्षी बकऱ्यांशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल, त्याच वर्षी फटक्यांशिवाय दिवाळी साजरी केली जाईल" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.
साक्षी महाराजांच्या फटाक्यांबाबतच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "जर देशामध्ये बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी झाली तर दिवाळीमध्येही फटाके फोडले जाणार नाहीत" असं साक्षी महाराज म्हणाले आहेत. साक्षी महाराज हे नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. सध्या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत फेसबुकवर अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्यावरूनच साक्षी महाराज यांनी जोरदार टोला लगावत निशाणा साधला आहे.
"प्रदुषणाच्या नावाखाली फटक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजाळू नका"
"ज्या वर्षी बकरीशिवाय बकरी ईद साजरी होईल, त्याच वर्षी फटक्यांशिवाय दिवाळी सुद्धा साजरी केली जाईल. प्रदुषणाच्या नावाखाली फटक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजळू नका" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी साक्षी महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून त्यांना धमकी दिली होती. साक्षी महाराजांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार करून धमकीला गंभीरतेने घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
साक्षी महाराज यांनी आपल्या तक्रारीत आपल्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांनाही मारण्याची धमकी देण्यात आल्याचं म्हटलं होतं. साक्षी महाराज यांना एका पाकिस्तानी क्रमांकावरून फोन आला होता. 'आमचा मित्र मोहम्मद गफ्फार याला पकडून तुम्ही आपल्या मृत्यूला निमंत्रण दिल्याचं' धमकी देणाऱ्याने म्हटल्याचं साक्षी महाराजांनी सांगितलं आहे. '10 दिवसांच्या आता तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू. मी आणि माझे मुजाहिद्दीन तुमच्यावर 24 तास नजर ठेवून आहेत. ज्या दिवशी संधी मिळेल तुम्हाला तुमच्या देवाकडे पाठवू. आमच्याकडे तुमच्या सर्व कार्यक्रमांची माहिती आहे' असंही धमकी देणाऱ्याने आपल्याला म्हटल्याचं साक्षी महाराजांनी म्हटलं होतं.