BJP vs Congress, Sonia Gandhi: "संबित पात्रा नाटकबाज माणूस, त्यांची नाटकं टीव्हीवर दिसतात"; मुख्यमंत्री गेहलोत यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 08:18 PM2022-07-26T20:18:19+5:302022-07-26T20:18:55+5:30
संबित पात्रा काँग्रेसवर कायम टीका करत असतात. त्यांना आज काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं.
BJP vs Congress, Sonia Gandhi ED: भाजपा प्रवक्ते संबित पात्राकाँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात आधी राहुल गांधी आणि आता सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. अशा वेळी, 'काँग्रेस पक्ष सत्याग्रहाचे नाटक करत आहे. कारण हे ५ हजार कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे प्रकरण आहे', असा थेट आरोप संबित पात्रा यांनी केला. पण राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी संबित पात्रा यांना 'नाटकबाज' म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
सोनिया गांधी या गेल्या आठवड्यात नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी सुमारे ३ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर आज त्यांना पुन्हा बोलवण्यात आले होते. दिवसभर त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना उद्याही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. या प्रकरणावर संबित पात्रा यांनी काँग्रेसबाबत वक्तव्य केली होती. त्यावर गेहलोत यांनी प्रत्युत्तर दिले.
"संबित पात्रा स्वत: अतिशय नाटकबाज आहेत. जे लोक नाटकवाले आहेत, ते टीव्हीवर कशी नाटकं करतात, हे सारा देश पाहतो. त्यांच्या नाटकाचा काही परिणाम होणार नाही. त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. ते एखादी गोष्ट सांगतात म्हणजे ती मान्य केलीच पाहिजे असं नाही. उलट ईडीने बाहेर येऊन साऱ्या गोष्टी मान्य करणे हा मुद्दा आहे. ईडीने पत्रकार परिषद घ्यावी की कोणत्या कारणांसाठी ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना फोन करत आहेत, चौकशीला बोलावत आहेत. पण तसे घडताना दिसत नाही. कारण ईडी ही गोष्ट सांगूच शकत नाही", असे ते म्हणाले.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दुसऱ्यांदा ईडीसमोर हजर झाल्या. ईडीच्या कारवाईचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध केला. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.