नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी राहुल गांधींवर पेड न्यूजचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी पेड न्यूजद्वारे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नक्वी यांनी केला आहे. नुकतेच राहुल गांधी यांनी हैदराबादमधील एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीसंदर्भात नक्वी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
यांसदर्भात भाजपानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत एक निवेदनदेखील दिले आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या मुलाखतीची प्रतिचाही समावेश आहे. हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रात छापण्यात आलेली राहुल गांधी यांची मुलाखत हे पेड न्यूज एक ज्वलंत उदाहरण असल्याचा भाजपानं दावा केला आहे.
(राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल)
निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांसोबत बैठक केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बातचित करताना नक्वी म्हणाले की, 'तेलंगणा आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या बरोबर एक दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी मुलाखतीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आणि ही एक पेड न्यूज आहे. हे निवडणूक सुधारणांचे उल्लंघन आहे.'
दरम्यान, या प्रकरणावर राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.