- हरीश गुप्ता नवी दिल्ली : राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी संसदेच्या इतिहासात आजवर कधीही ऐकिवात नव्हती अशी पद्धत शोधून भाजप विरोधी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहे. २४५ सदस्य असलेल्या राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ७८ आहे. स्वबळावर बहुमत प्राप्त करण्यासाठी भाजपला २०२० पर्यंत वाट पाहावी लागेल; परंतु तोवर महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सबुरीने घेण्यास भाजप तयार नाहीत.तेलगू देसमचे सहापैकी ४ खासदार भाजपत सामील झाले आहेत. समाजवादी पार्टीचे खासदार नीरज शेखर हेही राजीनामा देत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजप त्यांना पुन्हा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर आणणार आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे ३२५ आमदार असल्याने शेखर यांना पुन्हा राज्यसभेवर निवडून आणणे भाजपला सहज शक्य आहे. पुढल्या आठवड्यात निवडणूक आयोग कधीही राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्याची दाट शक्यता आहे.समाजवादी पार्टी आणि बसपाचे आणखी दोन संसद सदस्य राजीनामा देतील आणि या दोन जागांसाठी स्वतंत्रपणे पोटनिवडणूक घेतली जाईल, असे समजते. दोन्ही खासदार नोव्हेंबर २०२० मध्ये निवृत्त होणार आहेत. राज्यसभेवर पुन्हा निवडून आणण्यासोबत त्यांना २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल, असा सांगावा भाजपने त्यांना धाडला आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची मुदत वाढविली जाऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.राज्यसभेतील संख्याबळ याचवर्षी शंभरीपार नेण्याचा भाजपचा मनोदय आहे. मित्रपक्ष, तीन नामनियुक्त सदस्य तसेच समर्थकांमुळे राज्यसभेत भाजपने कामचलाऊ बहुमत मिळविले आहे. बिजू जनता दल (७), वायएसआर काँग्रेस (२), जेडीएसच्या एका सदस्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या बाजूने १२४ खासदार आहेत.>महाराष्टÑ, आसाम, बिहारकडेही लक्षयाशिवाय उत्तर प्रदेश, आसाम, बिहार आणि महाराष्टÑ आणि अन्य राज्यांतील विरोधी पक्षांच्या काही राज्यसभा सदस्यांचेही मन वळविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. ते भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लावून भाजपला राज्यसभेत महत्त्वाची विधेयके संमत करणे सोपे होईल.
राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी भाजप आतुर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 4:46 AM