हरीश गुप्ता
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा (लोकांच्या सेवेचा पंधरवडा) साजरा करण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. विविध सामाजिक संघटनांच्या समन्वयाने देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा पक्ष विचार करत आहे. ब्लड बँका, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि राज्यांचे आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्याचा विचार आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी या पंधरवड्याचा समारोप होईल. या निमित्ताने १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत शाळा आणि रुग्णालय परिसरात देशव्यापी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमधील यशस्वी खेळाडूंचा एक सत्कार कार्यक्रम राज्य मुख्यालयात आयोजित केला जाईल आणि त्यात खेळाडूंना आमंत्रित केले जाईल. यावेळी दिव्यांग खेळाडूंना सहायक ठरणारे साहित्य दिले आईल. आयुष्मान भारत योजनेच्या शुभारंभाच्या दिवसाचे औचित्य साधून २३ सप्टेंबर रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केले जाणार आहे.
खासदार, आमदार आणि विधान परिषद सदस्यांना त्यात सक्रिय सहभाग घेण्यास सांगण्यात येणार आहे. तसेच, पंतप्रधानांसंदर्भात एक चित्रप्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. बालसुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या 'पॉवर विदिन: द लीडरशिप अँड लेगसी ऑफ नरेंद्र मोदी' या पुस्तकावर आधारित सेमिनार आयोजित करण्याची भाजपची योजना आहे. कला, चित्रकला, निबंध, रांगोळी, आत्मनिर्भर भारत, विकसित भारत, स्थानिक विषयांवर आधारित स्पर्धा आयोजित करण्याची योजना आहे.
घरोघरी जाऊन सदस्यांची नोंदणी
• २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी, बूथनिहाय कार्यकर्ते घरोघरी जाऊन १०० सदस्यांची नोंदणी करतील. • २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जाईल. • त्यानंतर पुष्पांजली अर्पण केली जाईल आणि खादीचे उत्पादन खरेदी करण्याचेही आवाहन केले जाणार आहे.