नवी दिल्ली- ईशान्य भारतात नागालँड, मेघालय, त्रिपुरा येथे फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पार्टी ईशान्य भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये बळ वाढविण्यासाठी या तीन राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल यात शंका नाही. सध्या ईशान्य भारतामध्ये भाजपाची आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यांमध्ये सत्ता आहे. मात्र या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवणे भाजपासाठी तितके सोपे असणार नाही. मेघालयातील काँग्रेसकडून सत्ता मिळवणे तसेच त्रिपुरामधील डाव्यांचे प्रदीर्घ काळ चाललेले सरकार उलथवणे भाजपासाठी मोठे आव्हान आहे. नागालँडमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी नागालँड पिपल्स फ्रंटबरोबर सत्तेमध्ये आहे. तेथिल सत्ताही भाजपाला राखावी लागणार आहे.ईशान्य भारतामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम राज्यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी या आठही राज्यांमध्ये भाजपा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार असा मनोदय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. या राज्यांमध्ये हातपाय पसरण्यासाठी भाजपाने नॉर्थ-इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (नेडा)ची 2016 मध्ये स्थापन केली आहे. या राजकीय आघाडीमध्ये नागालँडमधील नागा पिपल्स फ्रंट, सिक्किमच्या सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट, आसामच्या आसाम गण परिषद व बोडोलँड पिपल्स फ्रंट यांचा समावेश आहे.मेघालयमध्ये 60 जागांपैकी कॉंग्रेसचे सध्याच्या विधानसभेत 23 आमदार होते, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे 7, हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1, नॅशनल पिपल्स पार्टीचे 2, गारो नॅशनल कौन्सील 1, नॉर्थ इस्ट सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचा 1 आणि 13 अपक्ष आमदार आहेत. मुकुल संगमा मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. पक्षांतर करुन भाजपामध्ये गेलेले लोक त्यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण करणार यात शंका नाही. नागालँडमध्ये 60 पैकी 48 जागा नागालँड पिपल्स फ्रंटकडे आहेत. भाजपाकडे 4 व अपक्षांकडे 8 जागा आहेत. सलग 11 वर्षे मुख्यमंत्री असणारे नेफियु रिओ 2014 साली मुख्यमंत्री झाले.
नागालँड, त्रिपुरा, मेघालयातील सत्तेसाठी भाजपाला कसावी लागणार कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 3:44 PM
ईशान्य भारतात नागालँड, मेघालय, त्रिपुरा येथे फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पार्टी ईशान्य भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये बळ वाढविण्यासाठी या तीन राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल यात शंका नाही.
ठळक मुद्देमेघालयमध्ये काँग्रेसला गळती लागल्यामुळे भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र तरिही तेथे पक्षाला विशेष प्रयत्न करावे लागतील.