Narendra Modi Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आता सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, आज(दि.7) राजधानी दिल्लीत NDA ची बैठक पार पडली, यावेळी सर्व खासदारांच्या संमत्तीने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी विविध मित्रपक्षांच्या प्रमुखांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीदेखील यांच्या नावाला संमती दर्शवली.
नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवडआज जुन्या संसद भवनात एनडीच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींना नेतेपदी निवडण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. प्रस्तावावेळी टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एकनाथ शिंदे, चिराग पासवान, पवन कल्याण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मी माझा पक्ष शिवसेनेतर्फे त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी या देशाचा विकास केला, देशाला पुढे नेले, जगात देशाचे नाव चमकावले, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करुन नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळेच खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना देशातील जनतेले नाकारले आणि तिसऱ्यांदा मोदींना स्वीकारले."
"मी शिवसेनेबद्दल इतकं सांगेन की, भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात आमची युती झाली होती त्यामुळे ही युती फेविकॉलचा जोड आहे, कधीच तुटणार नाही. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी प्रचंड मेहनत केली, त्यामुळेच देशाने सलग तिसऱ्यांदा त्यांची जादू पाहिली आहे. मी पंतप्रधानांसाठी एक कविता सादर करतो. 'मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खिंचा है. मैं पत्थर पे लिखी इबारत हु , शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे..." अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.