महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपा-शिवसेनेचा स्वबळाचा नारा?
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
संदीप प्रधान
संदीप प्रधाननागपूर- महापालिकांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना यांच्यात जागावाटपावरून खडाखडी होणार, असे संकेत आतापासून प्राप्त होऊ लागले आहेत. भाजपाला मुंबई, ठाणे महापालिकांसह सर्व महापालिकांत निम्म्या जागा भाजपाला सोडण्याचा आग्रह त्या पक्षाने शिवसेनेकडे धरलेला आहे. त्यामुळे अनेक प्रमुख महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत.सर्वात प्रथम २०१५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक होणार असून त्यानंतर २०१६ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या दोन महापालिकेत जरी भाजपाने निम्म्या जागांची मागणी केली तरी भाजपा-शिवसेनेत संघर्ष सुरु होऊ शकतो. मुंबई महापालिकेत निम्म्या जागा भाजपाने मागितल्या तर त्यांना ४३ जागा वाढवून द्याव्या लागतील. सध्या शिवसेना व भाजपा लढवत असलेल्या जागांमधील अंतर ५८ जागांचे आहे.शिवसेनेचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करताना महापालिकांमध्ये निम्म्या जागा भाजपाला सोडण्याची हमी देण्याची अट घालण्याचा प्रस्ताव भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला होता. मात्र महापालिका जागांची चर्चा आता नको, असे सांगत शिवसेनेने त्याला विरोध केला होता. परंतु भाजपाने निम्म्या जागांचा मुद्दा सोडलेला नाही. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सर्व महापालिकांत युती अशक्य असल्याचे केलेले सूतोवाच हे त्याचेच द्योतक मानले जात आहे. मुंबईकरिता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्याच्या मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला विरोध करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्पितळातून धाडण्यामागेही महापालिका निवडणुका कळीच्या ठरणार हे पवार यांच्या चाणाक्ष नजरेने हेरल्याचे निदर्शक आहे. नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना महापालिका निवडणुकीकरिता कामाला लागण्याचा आदेश दिला आहे.