नवी दिल्ली : दिल्ली महापालिकांच्या १३ वॉर्डांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जबरदस्त झटका बसला आहे. पक्षाने केवळ तीन वॉर्डांत विजय मिळविला असून, या निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेल्या ‘आप’ने पाच जागांवर कब्जा केला आहे. काँग्रेसही चार वॉर्डांत विजयी झाली. गेल्या निवडणुकीत १३पैकी ७ जागांवर भाजपा विजयी झाली होती.दिल्लीत सत्तेवर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या लोकप्रियतेचा ‘बॅरोमीटर’ म्हणून आप या निवडणुकीकडे पाहात होती आणि विरोधी पक्षांचा सफाया करण्याच्या उद्देशानेच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. पण या पक्षाची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. काँग्रेसला मिळालेले यश म्हणजे हा पक्ष आता सावरत असल्याचे म्हटले जाते. काँग्रेसचे बंडखोरनेते राजेंद्रसिंग तंवर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून दक्षिण दिल्लीतील भाटीमधून विजय मिळविला. २०१२मध्ये दिल्ली मनपाची तीन भागांत विभागणी करण्यात आली. या पालिकांवर एक दशकापासून भाजपाची सत्ता आहे. निवडणूक झालेल्या १३ वॉर्डांपैकी सात भाजपाच्या ताब्यात होते तर एक राष्ट्रीय लोकदल आणि पाच अपक्षांच्या ताब्यात होते.>सर्वाधिक जागांवर विजयी केल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ‘आप’ने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी सार्वत्रिक निवडणुकीत सर्व जागा जिंकायच्या आहेत.मताच्या टक्केवारीचा विचार करता भाजपा प्रथम क्रमांकावर आहे. भाजपाला ३४.११ टक्के, ५ वॉर्ड जिंकणाऱ्या ‘आप’ला २९.९३ टक्के आणि ४ वार्ड जिंकणाऱ्या काँग्रेसला २४.८७ टक्के मते मिळाली.दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन म्हणाले की, आमच्यासाठी हा फार मोठा विजय आहे. ज्या चार वॉर्डांत पक्षाला विजय मिळाला आहे तेथे २००७ आणि २०१२ सालीही विजय मिळाला नव्हता.
दिल्ली महापालिकेत भाजपाला झटका
By admin | Published: May 18, 2016 4:44 AM