नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला दिल्लीतील शिक्षकांना आमंत्रित केले आहे. मात्र त्यांच्या निर्णयावरून राजकारणा तापले असून भाजपने यावर टीका केली आहे. 'आप'चे नेते मनिष सिसोदिया यांनी भाजपच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी शिक्षकांना जबरदस्ती बोलवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यानंतर आम आदमी पक्षाने पलटवार करताना भाजपने शिक्षकांचा सन्मान करायला शिकावे, अस म्हटले आहे.
पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांनी शिक्षकांना जबरदस्ती शपथविधी सोहळ्यांना बोलविल्याचा आरोप केला. तर काँग्रेस नेते मुकेश वर्मा यांनी देखील आपच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. याला उत्तर देण्यासाठी मनिष सिसोदिया यांनी भाजप आणि काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिले. काँग्रेस आणि भाजपला शिक्षकांचा सन्मान करणे माहित नसल्याचे सिसोदिया म्हणाले.
जनतेने केजरीवाल मॉडल ऑफ डेव्हलपमेंटला विजयी केले आहे. हा जनतेचा विजय आहे. या विजयामुळे जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकार मिळाले आहे. शपथविधी सोहळ्यात मुख्य अतिथी दिल्लीकरच असतील, असंही सिसोदिया म्हणाले.