इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये; मुख्यमंत्र्यांची मोदींवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:01 AM2019-12-31T10:01:01+5:302019-12-31T10:02:15+5:30
देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले.
जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांकडून काँग्रेसच्या वारशावर हल्लाबोल करण्यात येतो. पण इंग्रजांच्या खबऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी जहरी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या 135 व्या स्थापना दिनी शहिद स्मारकाच्या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षातील लोक पंडित नेहरूंच्या वारश्याविषयी बोलत असतात. पंडित नेहरूंनी आम्हाला त्यागाचा, बलिदानाचा आणि वेळप्रसंगी कारागृहात जाण्याचा वारसा दिला आहे. देशासाठी बलिदान देण्याचा वारसा आहे. राजीव गांधी यांनी बलिदान दिले तो देखील वारसा होता. मात्र तुमच्या पक्षाच्या विचारधारेचे लोक इंग्रजांसाठी खबऱ्यांच काम करत होते. असे लोक काँग्रेसच्या विरासतीच्या गप्पा मारत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे गेहलोत म्हणाले.
आमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. काँग्रेस पक्षाला पाहता पाहता 135 वर्षे झाल्याचे सांगताना गेहलोत म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा दहा वर्षांचा काळ सर्वांना ठावूक आहे. तो काळ अधिकारांचा होता. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगार अधिकार, मनरेगा, अन्नसुरक्षा कायदा हे छोटे निर्णय नव्हते, असंही गेहलोत यांनी सांगितले.
दरम्यान देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले.