दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी; भाजपाचा वाड्रांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:13 PM2019-02-06T14:13:01+5:302019-02-06T14:14:59+5:30
प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात येताच भाजपाचा हल्लाबोल
नवी दिल्ली: प्रियंका गांधींनी काँग्रेसच्या महासचिव पदाचा कार्यभार स्वीकारताच भाजपानं त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आज एक पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो होते. त्यावरुन भाजपानं काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसच्या एका पोस्टरवर जामीनावर असलेले दोघे दिसत आहेत, असा टोला भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला.
'राहुल गांधींनी 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून पैसे खाल्ले आहेत. तर रॉबर्ट वाड्रा आज मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर राहणार आहेत. सध्या जामीनावर असलेले हे दोघे एकाच पोस्टरवर दिसत आहेत,' अशी टीका पात्रांनी केली. रॉबर्ट वाड्रा यांच्या मालकीची एक मोठी प्रॉपर्टी असल्याचं आम्ही काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. मात्र लंडनमध्ये त्यांचे एकूण आठ फ्लॅट आहेत, ही माहिती आज देत आहोत. यूपीए-1 च्या काळात पेट्रोलियम आणि संरक्षण करारांमधून वाड्रा यांना प्रचंड दलाली मिळाली. त्याच पैशांमधून लंडनमध्ये फ्लॅट्स खरेदी करण्यात आले. यातील एका-एका फ्लॅटची किंमत कोटींच्या घरात आहे, असे गंभीर आरोप पात्रांनी केले.
सेंटेक इंटरनॅशनल नावाची एक कंपनी वाड्रा यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या संजय भंडारी यांची आहे. पेट्रोलियम व्यवहारातून मिळालेली दलाली याच कंपन्यांच्या खात्यात गेली. त्याच पैशांमधून लंडनमध्ये फ्लॅट्स खरेदी करण्यात आले. याशिवाय 2009 मध्ये झालेल्या एका करारातून मिळाळेला पैसा स्कायलाईट नावाच्या दुबईस्थित कंपनीच्या खात्यात गेला. या कंपनीची मालकी सीपी थंपीकडे आहे. थंपी यांची फेमा अंतर्गत चौकशी सुरू आहे. ही व्यक्ती भंडारी आणि वाड्रांसाठी काम करते, असे गंभीर आरोप पात्रा यांनी केले.