नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालमधील माध्यमिक शाळेतील परीक्षेच्या एका पेपरमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. 'टीएमसी टीचर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या परीक्षांच्या पेपरमध्ये काश्मीरला पाकिस्तानचा आणि अरुणाचल प्रदेशला चीनचा हिस्सा दाखवण्यात आले आहे', असे भाजपाचे म्हणणे आहे. हा पेपर 10 इयत्तेतील विद्यार्थ्याचा आहे. संबंधित परीक्षा पेपर पश्चिम बंगाल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशनतर्फे जारी करण्यात आला आहे, असा आरोप भाजपानं केले आहे.
भाजपाचे राहुल सिन्हा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, ''टीएमसीला नेमके काय हवंय? त्यांना देशाची विभागणी करायची का?. जे सैनिक काश्मीर व अरुणाचल प्रदेशात देशवासियांच्या सुरक्षेसाठी आपल्या जिवाची बाजी लावत आहेत, हा त्यांचा अपमान आहे. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्र्यांना पदावरुन तातडीनं हटवण्यात यावं, अशी मागणीदेखील केली आहे. शिवाय, काँग्रेस व टीएमसीनं याप्रकरणी माफी मागवी, अशीही मागणी केली आहे.
तर दुसरीकडे, या प्रकरणासंदर्भात मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून, सोबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार, असे बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी राजू बॅनर्जी यांनी सांगितले आहे. दरम्यान, अशा प्रकारे भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीनं सादर केल्याप्रकरणी गदारोळ झाल्याचे हे पहिलेच प्रकरण नाहीय. यापूर्वीही देशाचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.