नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smirit Irani) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Wadra) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मतांसाठी राजकारण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. "मी पहिल्यांदा जेव्हा अमेठीत आले तेव्हा इथे जिल्हाधिकारी कार्यालय नव्हते, मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, मुख्य शिक्षणाधिकारी कार्यालय अस्तित्वात नव्हते. एवढंच नव्हे तर इथे रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या, ट्रॉमा सेंटर नव्हते, महिला आणि मुलांसाठी विशेष रुग्णालये नव्हती, योग्य अग्निशमन केंद्र नव्हते" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
"अमेठीच्या जनतेला मागच्या तीन-चार दशकांपासून फक्त आश्वासनंच मिळाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाचं देखील आश्वासन देण्यात आलेलं पण ते अस्तित्वात मात्र आलं नव्हतं. गेली अनेक वर्षे अमेठीला ज्या गोष्टींची आश्वासनं मिळाली होती, त्या सगळ्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत" असं म्हणत स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "गांधी कुटुंबाने अमेठीतील गरीब जनतेचा फक्त मतांसाठी वापर केला. बाकी त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव आहे" असं देखील म्हटलं आहे. न्यूज १८ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्मृती इराणी यांनी हे म्हटलं आहे.
"भाजपाची सत्ता आल्यानंतर तीन लाख शौचालये बांधण्यात आली"
"सध्या प्रियंका गांधी 'लड़की हूं लड़ सकती हूं' अशी मोहीम चालवत आहे, मग त्या भावासोबत येथे का आल्या? त्या एकट्या लढू शकत नाहीत का? जर मुलींबाबत त्या बोलत असतील तर अमेठीत वर्षानुवर्षे महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे का बांधली गेली नाहीत. भाजपाची सत्ता आल्यानंतर तीन लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. अमेठीच्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे राहण्यासाठी घरे नव्हती. मात्र आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत अनेक कुटुंबांना घराची भेट मिळाली आहे. गांधी घराण्याने घर किंवा वैद्यकीय महाविद्यालये बांधली नाहीत. माझ्या कार्यकाळात अमेठी येथील रुग्णालयात पहिले सीटी स्कॅन मशीन आणण्यात आले" असं म्हणत इराणी यांनी जोरदार टीका केली आहे.