Rahul Gandhi Ram Mandir News: अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काँग्रेसने ते नाकारले. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधीअमेठी आणि रायबरेलीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी अयोध्येत जाऊन राम मंदिरात रामललाचे दर्शन घेऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेवर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.
अमेठीतून भाजपाकडून स्मृति इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत स्मृति इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. एका सभेला संबोधित करताना स्मृति इराणी यांनी राहुल गांधी यांच्या संभाव्य अयोध्या दौऱ्यावर सडकून टीका केली. वायनाड येथील काँग्रेसचे उमेदवार आता इथे येणार आहेत, पण त्याआधी ते राम मंदिरात जाणार आहेत. त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले, पण आता ते राम मंदिरात जाणार आहेत. कारण त्यांना वाटते की, असे केल्याने त्यांना मते मिळतील, म्हणजे आता ते देवालाही फसवायला जातील, या शब्दांत स्मृति इराणी यांनी हल्लाबोल केला.
वायनाड येथून खासदार असलेल्या राहुल गांधी यांच्या अमेठीबाबतच्या निष्ठेवर स्मृति इराणी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते अमेठीशी घनिष्ठ संबंध असल्याबाबत सांगत असतात. परंतु, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते वायनाड हे 'आपले घर' असल्याचा दावा करतात, असा टोला स्मृति इराणी यांनी लगावला. तसेच माणसे रंग बदलताना आपण पाहिली आहेत, पण कुटुंबे बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी टीका इराणी यांनी केली.